यंत्रणेला आली जाग ! ; कोकणसाद LIVE IMPACT

Edited by: कृष्णा ढोलम / प्रसाद पाताडे
Published on: November 22, 2023 19:40 PM
views 512  views

सिंधुदुर्ग : कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद LIVE व कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद नेहमीच कोकणवासियांच्या प्रश्नांसाठी  पुढाकार घेत आवाज उठवत आलं आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन होऊन ४२ वर्ष होऊन देखील आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा कोकणसादनं समोर आणला होता. 'आरोग्याची दैना' मांडत परिस्थितीच पोस्टमार्टम आम्ही केलं होतं. या दणक्यानंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली असून जिल्हावासियांसह सत्ताधारी-विरोधी लोकप्रतिनिधींच्या देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामान्य जनतेत मात्र आरोग्य व्यवस्थेविरूद्ध संतापाची लाट उसळली आहे.


ग्रामीण रूग्णालयाला टाळ ठोका ! या दोडामार्गमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच वास्तव कोकणसादनं पुढे आणलं. अर्ध्याहून अधिक रिक्तपद, गैरहजर डॉक्टर, मशीनरींचा अभाव यावर बोट ठेवत आरोग्य यंत्रणेच पोस्टमार्टम केलं. रिक्त पद भरण्यात व सिंधुदुर्गला आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यात कोकणचे लोकप्रतिनिधी का कमी पडतायत ? असा सवाल आम्ही केला होता. कोकणसादनं आवाज उठवताच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याच कौतुक करत सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथील गैरकारभार, अस्वच्छता, रुग्णांना मिळत नसलेल्या सेवा, रुग्ण गोव्याला रेफर करण्याचे प्रमाण आदी विविध मुद्यांवर बुधवारी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांची भेट घेत त्यांना धारेवर धरलं. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गैरकारभाराचा त्यांनी पाढाच वाचला. येथील अस्वच्छता, रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही, शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आदी मुद्यांकडे लक्ष वेधलं. तर चांगली आरोग्य सेवा मिळत नसेल तर हे रुग्णालय बंद केलेलेचं चागलं असं अमित सामंत म्हणाले. १५ दिवसांत परिस्थिती न बदलल्यास डीन यांच्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे असे सांगत वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ.सुनीता रामानंद यांनी सर्व अपयशाचे खापर शासनावर फोडलं. आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यात यश येत नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्ण सेवा देताना अडचण येत आहे. तसेच रुग्णाला चांगली आरोग्य सेवा मिळावी आणि त्याला उपचार मिळावेत त्यांचे प्राण वाचावेत यासाठी आम्हाला रुग्ण रेफर करावे लागत आहेत. 

हे वैद्यकीय महाविद्यालय नव्याने मंजूर झाले आहे अद्याप येथे आवश्यक सुविधा शासनाने पुरविलेल्या नाहीत. आवश्यक डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत. येथे मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची रिक्त पदे आहेत. याबाबत वेळोवेळी शासनाला अहवाल दिला आहे. येथे प्रसूतीतज्ञ, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ या सर्व विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याने सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. मंजूर पदापैकी केवळ पंधरा टक्केच पदे भरलेले आहेत. त्यामुळे अपेक्षित सेवा पुरवणे शक्य नाही. ही सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेले आरोग्यसेवा मिळणार असं डॉ. सुनिता रामानंद यांनी स्पष्ट केलं.


डीन डॉ.सुनीता रामानंद यांच्या प्रतिक्रियेवर महाविद्यालयासठी ठाकरे सरकारच्या काळात पुढाकार घेतलेले खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे‌. डीन यांच्या तक्रारीत वाढ होत असून त्यांची ताबडतोब बदली करण्यासाठी मागणी करणार असल्याचं खा. विनायक राऊत म्हणाले. खासदार विनायक यांच्यासह विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. आलटून पालटून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांकडे बोट दाखावायला सुरुवात झालीय. सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. तर विरोधी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्र्यांना जबाबदार धरले आहे. त्यांचा निवडणुकीच्या राजकारणात लक्ष देण्यास वेळ जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर सरकारचा भाग असलो तरी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आ.‌नितेश राणे म्हणालेत.

 

रिक्त पद व आरोग्य यंत्रणेच्या दैनेबाबत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. रिक्त पद प्राधान्याने भरणं आवश्यक आहे. तरच आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग सक्षम होईल. त्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांना डिग्री प्राप्त केल्यानंतर किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देण बंधनकारक करण आवश्यक आहे अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेकडून महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे अशी माहिती देव्या सुर्याजी यांनी दिली आहे.

एकंदरीत, कोकणसादनं आवाज उठवताच आरोग्य यंत्रणा जागी झालेली पहायाल मिळत आहे. ज्या पद्धतीने सत्तेत किंवा विरोधात आहोत याचा विचार न करता दोडामार्गात सर्वपक्षीय आरोग्यसाठी एकवटले. त्याचप्रमाणे लोकांच प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय पादत्राणं बाजूला सारून सिंधुदुर्ग हेल्दी राखण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप न करता जिल्ह्याची डळमळीत झालेली आरोग्य व्यवस्था सक्षम करण काळाची गरज आहे. त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न होण आवश्यक आहे अशी मागणी सर्वसामन्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था मजबूत होत नाही तो पर्यंत कोकणसाद LIVE मात्र व्यवस्थेचा पाठपुरावा करतच राहणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या आडमुठ्या धोरणाच्या बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत. मागील महिन्यात बैठक करून देखील त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. जिल्ह्यातून रूग्णांच्या गोवा-बांबोळी, कोल्हापूर फेऱ्या वाढलेल्या आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच आहेत‌‌. ही परिस्थिती वरिष्ठांच लक्षात आणून देत त्यांची ताबडतोब बदली करा अशी मागणी करणार आहे. रूग्णांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत. आमच सरकार असताना आमचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री जस लक्ष सिंधुदुर्गवर देत होते तसं लक्ष आताचं सरकार त्यांचे मंत्री देत नाही हे दुर्दैव आहे. 


- विनायक राऊत, खासदार


 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केला होता. चांगली सेवा शासकीय रुग्णालयात दिली. कोरोना नंतर महिला रुग्णालय सुरू केलं. परंतु शासकीय मेडिकल रुग्णालयात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षात आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कधीच आढावा घेतला नाही. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणं गरजेचे होते. मात्र त्यांना निवडणुकीच्या राजकारणात लक्ष घालण्यास वेळ आहे. त्यामुळेते आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करून हेळसांड करत आहेत हे आता लोकांच्या लक्षात आल आहे. 


- वैभव नाईक, आमदार


 जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती २०१४ नंतर नित्याचीच राहिली आहे. मी अनेक अधिवेशनात याबाबत आवाज उठवला होता. आता सत्तेत असलो तरी येणाऱ्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत हे वास्तव आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आयसीयुतच ठेवायचे आहे का ? त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत माझं सरकार असले तरी अधिवेशनात प्रश्न विचारणार


-नितेश‌ राणे, आमदार


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष दिला असता तर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील मोठा प्रश्न मार्गी  लागला असता. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला आहे. त्यांना कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र याशिवाय काही दिसत नाही. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खालावण्यास मुश्रीफ जबाबदार आहेत. 


- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट